अनुसूचित जाती उपवर्गीकरणासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये जनआक्रोश महामोर्चा !

चाणक्य NEWS | पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
अनुसूचित जाती (SC) आरक्षणातील उपवर्गीकरण महाराष्ट्रात तातडीने लागू करावे, या मागणीसाठी आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आला. महामोर्चात अंदाजे २० ते २५ हजार समाजबांधव सहभागी झाले.
चिंचवड स्टेशन येथील क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून दुपारी १२ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. मातंग, मादीगा, वाल्मिकी, ढोर तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील विविध समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत घोषणाबाजी करत उपवर्गीकरणाची मागणी लावून धरली.

सुमारे पाच तासांच्या प्रवासानंतर मोर्चाची सांगता निगडी तहसील कार्यालयासमोर झाली. यावेळी शिष्टमंडळाने तहसीलदार जयकुमार देशमुख यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या १ ऑगस्ट २०२४ रोजीच्या निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्रात अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण तातडीने लागू करावे, वंचित घटकांना आरक्षणाचा न्याय्य लाभ मिळावा आणि आवश्यक प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
महामोर्चाला विविध लोकप्रतिनिधी, समाजनेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. सकल मातंग समाज पिंपरी-चिंचवड तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी महामोर्चाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.



