पुणेमहाराष्ट्र

कृषीतंत्र विद्यालय मांजरी येथे साहित्यसम्राटचे अभूतपूर्व 230 वे कविसंमेलन !

पुणे | प्रतिनिधी – उप-संपादक सीताराम गायकवाड | चाणक्य NEWS
निर्मिती मीडिया सोल्युशन आणि समाज विकास संस्था, मांजरी यांच्या संयुक्त विद्यमाने मांजरी फार्म येथील कृषी तंत्र विद्यालयात जीवनगौरव पुरस्कार सोहळा व साहित्यसम्राट संस्थेचे २३० वे कविसंमेलन उत्साहात पार पडले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर माजी आमदार गजानन बापू शेवाळे, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य अमित पवार, महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेच्या स्मिताताई वाघ, रतन माळी, सामाजिक कार्यकर्ते योगेश कुलकर्णी, बाळासाहेब विभुते, मुख्य आयोजक देविदास झुरंगे, संपादक शिवराम कांबळे आणि साहित्यसम्राट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ आदी मान्यवर उपस्थित होते.

सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते व ‘फु बाई फु’ फेम विकास समुद्रे  ( दादूस ) यांना मान्यवरांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचाही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

हास्य, सामाजिक संदेश आणि प्रबोधनाने रंगले कविसंमेलन

साहित्यसम्राट संस्थेचे २३० वे कविसंमेलन कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य अमित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. शेत, जमीन, शेतकरी, शेतकरी आत्महत्या, वृक्ष, पशुपक्षी, पाणी, जीवन, माणुसकी, प्रेम, विद्रोह आणि प्रबोधन अशा विविध विषयांवरील कविता कवींनी सादर केल्या. हास्यविनोद, सामाजिक संदेश आणि प्रबोधन यांचा सुरेख मिलाफ झाल्याने कविसंमेलनाने रसिकांची मने जिंकली.

               

कवी जयद्रथ आखाडे यांनी माणसाला जीवन आणि वेळेची किंमत समजावून सांगणाऱ्या सामाजिक आशयाच्या कवितेतून उपस्थितांचे लक्ष वेधले. श्रीकांत वाघ यांनी श्रावणातील पाऊस आणि निसर्गाचा आनंद आपल्या कवितेतून व्यक्त केला.

गणेश पुंडे यांनी स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. रेखा दुसाने यांनी ‘निसर्गाची शपथ’ या कवितेतून निसर्गाचे महत्त्व आणि त्याच्याशी असलेले मानवाचे नाते प्रभावीपणे मांडले.

शांतीलाल ननावरे यांनी श्रीकृष्णावरील प्रेमगीत सादर करत रसिकांची दाद मिळवली. तर तानाजी शिंदे यांनी ‘माझं सुंदर रान’ या निसर्गकवितेतून पशुपक्षी आणि ग्रामीण जीवनाचे चित्र उभे केले.

संपादक शिवराम कांबळे यांनी आपल्या कवितेतून मानवी जीवनातील वास्तव आणि अंतर्मनातील संघर्ष मांडला. त्यांच्या कवितेला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

‘सुराज्य’ कवितेने सभागृह भारावले

कविसंमेलनाच्या समारोपात चतुरस्त्र कवी व साहित्यसम्राटचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ यांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘काव्य बोले काळजाला’ या उपक्रमाची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी विनोद आणि प्रबोधनाचा संगम साधत सुप्रसिद्ध ‘सुराज्य’ ही वीररस कविता सादर केली. कवितेतील सामाजिक आशयामुळे सभागृहात उत्स्फूर्त टाळ्यांचा कडकडाट झाला.

यावेळी कवयित्री रूपाली पाटील, सुनिता घोडके, अरुण घोडके, प्रा. गौरव नेवसे, स्नेहा भोसले, प्रथमेश कोळी, प्रा. अमित पवार तसेच कृषी विद्यापीठातील अनेक विद्यार्थिनी आणि प्राध्यापिका यांनी उत्स्फूर्तपणे कविता सादर केल्या.

कविसंमेलनातील सहभागी कवी-कवयित्रींचा अभिनेते विकास समुद्रे अर्थात दादूस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार मुख्य आयोजक शिवराम कांबळे यांनी मानले, तर संपूर्ण कविसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन चतुरस्त्र कवी विनोद अष्टुळ यांनी केले.

हास्य, साहित्य, सामाजिक भान आणि प्रबोधनाचा सुरेख संगम घडविणारे हे २३० वे कविसंमेलन रसिकांच्या स्मरणात राहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!