दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा शुल्क माफ !
फेब्रुवारी-मार्च २०२७ च्या बोर्ड परीक्षेसाठी शुल्क आकारले जाणार नाही .

मुंबई | प्रतिनिधी – मुख्य संपादक – कृष्णा गवळी | चाणक्य NEWS
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने महत्त्वाचा दिलासा दिला आहे. दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आलेल्या २६५ तालुक्यांतील विद्यार्थ्यांकडून फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या SSC आणि HSC बोर्ड परीक्षांसाठी परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीनंतर या निर्णयाची माहिती दिली. विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊन नंतर ते परत करण्याऐवजी सुरुवातीलाच शुल्क न घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने संबंधित दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता ऑनलाइन परीक्षा अर्ज भरून घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या कार्यवाहीचा अहवाल मंडळाकडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

दुष्काळामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या कुटुंबांवरील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित तालुक्यांतील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्या अर्जाच्या वेळी परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही.




