लातूरमध्ये विद्यार्थी आक्रोश मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद; MPSC अध्यक्ष व सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

लातूर | चाणक्य NEWS प्रतिनिधी :
लातूरमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी आक्रोश मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. मोर्चात सहभागी होत विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यात आला तसेच त्यांच्या विविध मागण्यांबाबत संवाद साधण्यात आला. विविध क्लासेसचे संचालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत विद्यार्थी एकजुटीचे दर्शन घडविले.
हा मोर्चा यशस्वी होऊ नये यासाठी सरकारकडून काही क्लासचालकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मात्र, स्वाभिमानी क्लासचालक आणि विद्यार्थ्यांनी हा दबाव झुगारून मोर्चाला उपस्थिती लावल्याचा दावा आंदोलकांकडून करण्यात आला.
MPSC अध्यक्ष आणि सचिवांच्या राजीनाम्याची मागणी
MPSC चे अध्यक्ष आणि सचिव यांनी राजीनामा द्यावा, ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ही मागणी पूर्ण होईपर्यंत तसेच या पदांवर स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती होईपर्यंत विद्यार्थ्यांचा आक्रोश थांबणार नसल्याची भूमिका व्यक्त करण्यात आली.
गट-क परीक्षा पुढे; ३० ते ४० हजार पदांची भरती काढण्याची मागणी
MPSC ने महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जानेवारीपर्यंत पुढे ढकलल्याच्या पार्श्वभूमीवर, तोपर्यंत सरकारने ३० ते ४० हजार पदांची भरती प्रक्रिया जाहीर करावी, अशी मागणीही करण्यात आली.
तसेच वर्षभरात होणाऱ्या विविध परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून एकत्रित केवळ १०० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात यावे, अशी मागणी यावेळी मांडण्यात आली.


विद्यार्थ्यांशी व्यापक चर्चा करण्याचे आवाहन
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेल्या विद्यार्थ्यांनी राज्यातील इतर विद्यार्थ्यांशीही भेट घेऊन MPSC अध्यक्ष व सचिवांच्या राजीनाम्यासह अन्य मागण्यांवर खुली चर्चा करावी आणि पुढील आंदोलनाची भूमिका तातडीने निश्चित करावी, असे आवाहन करण्यात आले.
“विद्यार्थी यापुढे जी भूमिका घेतील, त्या भूमिकेला माझा पूर्ण पाठिंबा राहील,” असे आश्वासन यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आले.
शिक्षक, क्लासचालक आणि विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती
मोर्चात प्रा. महेश मोरे, प्रा. रमेश भारती, प्रा. उत्तम पवार, प्रा. अरुण धायगुडे, प्रा. धोंडीराम भिंगोले, प्रा. प्रतीक पितांबरे, प्रा. प्रशांत मोरे, प्रा. शरद दाणे, प्रा. सुशील कोरे, प्रा. दयानंद हाळे, प्रा. धनंजय कोपणार, प्रा. विकास पुरी, प्रा. गोविंद जाधव, धनराज कोपनर, सोमनाथ गलांडे, मा. आ. सुनील भुसारा, अभय साळुंखे, फहाद अहमद, सक्षणाताई सलगर यांच्यासह विविध क्लासेसचे संचालक, शिक्षक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोर्चाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मागण्यांना व्यापक पाठिंबा मिळत असून, आगामी काळात आंदोलनाची दिशा काय असेल याकडे आता विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्राचे लक्ष लागले आहे.




