‘उजनीचे पाणी येणार… पण कोठून येणार?’
अंबादास दानवेंचा लातूरच्या स्थानिक नेतृत्वावर घणाघात; विकासाच्या घोषणांचा हिशोब जनतेसमोर मांडण्याचे आव्हान

लातूर | चाणक्य NEWS | प्रतिनिधी
‘मराठवाड्याचा विकास, तुम से ना हो पायेगा!’ या घोषवाक्याखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने १ ते १७ सप्टेंबरदरम्यान मराठवाडाभर जनआंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून लातूरच्या महात्मा गांधी चौकात जोरदार जनआंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी लातूरच्या पाणीप्रश्नासह रखडलेल्या विविध विकासकामांवरून सरकार आणि स्थानिक नेतृत्वावर जोरदार टीका केली.
‘उजनीचे पाणी नेमके कोठून येणार?’
लातूरच्या गंभीर पाणीप्रश्नावर भाष्य करताना अंबादास दानवे यांनी स्थानिक नेत्यांच्या ‘उजनीचे पाणी लातूरला आणणार’ या आश्वासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “लातूरचे नेते सांगतात उजनीचे पाणी येणार; पण ते येणार कोठून?” असा थेट सवाल त्यांनी केला.
लातूर हा उंच पठारी भाग असल्याचे सांगत दानवे यांनी गोदावरी, कृष्णा आणि तापी नदीखोऱ्यांचा संदर्भ दिला. प्रत्येक नदीखोऱ्यातील पाणीवाटपाच्या मर्यादा लक्षात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे लातूरला पाणी कोणत्या योजनेतून, कोणत्या मार्गाने आणि कोणत्या स्रोतामधून मिळणार, याचा स्पष्ट आराखडा जनतेसमोर मांडण्याची मागणी त्यांनी केली.
“लातूरच्या जनतेला केवळ आश्वासनांचे गाजर दाखवू नका. उजनीचे पाणी नेमके कोठून आणि कोणत्या योजनेतून येणार, हे स्पष्ट सांगा,” असे आव्हान दानवे यांनी स्थानिक नेतृत्वाला दिले.
विकासाच्या घोषणांचा हिशोब द्या
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी विविध सरकारांच्या काळात छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत लातूर जिल्ह्यासाठी अनेक विकासकामांच्या घोषणा करण्यात आल्या. मात्र, वर्षानुवर्षे उलटूनही अनेक घोषणा प्रत्यक्षात उतरलेल्या नसल्याचा आरोप दानवे यांनी केला.
लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उदगीर येथील नाट्यगृह व भूमिगत गटार योजना, लातूर रस्ते विकास प्रकल्प, लातूर-बार्शी-टेंभुर्णी महामार्गाचे चौपदरीकरण, उदगीर-जळकोट येथील एमआयडीसी, हत्तीबेट पर्यटनस्थळाचा विकास, बाबांच्या समाधीस्थळाचा विकास, मातोळा येथील हुतात्मा स्मारक, वडवळ-नागनाथ टेकडीचा विकास तसेच कोल्हापुरी बंधाऱ्यांचे लातूर टाईप बॅरेजमध्ये रूपांतर यांसारख्या कामांचा त्यांनी उल्लेख केला.

रेल्वे, सिंचन आणि आरोग्य सुविधांवरही सवाल
कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा लातूर टप्पा, मातोळा-रोहतवाडी साठवण तलाव, लातूर रेल्वे डबा कारखाना व एमएसएमई क्लस्टर, वर्धा-नांदेड नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग, लातूर रेल कोच फॅक्टरीतील वंदे भारत स्लीपर कोच निर्मिती, राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण व मजबुतीकरण, लातूर सुपर स्पेशालिटी रुग्णालय, सोयाबीन प्रक्रिया व संशोधन केंद्र आणि लातूर विमानतळ विस्तारीकरण या विषयांकडेही दानवे यांनी लक्ष वेधले.
‘घोषणा नव्हे, अंमलबजावणी महत्त्वाची’
विकासकामांच्या केवळ घोषणा करून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा त्या प्रत्यक्षात आणणे महत्त्वाचे असल्याचे दानवे यांनी सांगितले. “लातूर जिल्ह्यातील प्रत्येक विकासघोषणेची सद्यस्थिती, मंजूर निधी, कामाची प्रगती आणि पूर्णत्वाची अपेक्षित तारीख सरकारने जनतेसमोर जाहीर करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
जनतेच्या पैशातून होणाऱ्या विकासकामांचा हिशोब जनतेला मिळालाच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
दरम्यान, लातूरमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असताना पाणी आणण्याच्या घोषणा वारंवार होत आहेत. मात्र, पाणी प्रत्यक्षात कधी येणार आणि त्यासाठीची ठोस योजना काय आहे, याबाबत सरकार व स्थानिक नेतृत्वाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली.
या आंदोलनास आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, संपर्कप्रमुख रोहिदास चव्हाण, दिलीप घुगे, जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, पप्पु कुलकर्णी, बालाजी जाधव, बजरंग जाधव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




