जुन्नरमध्ये मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून दुचाकींना धडक; एक जखमी, वाहनांचे नुकसान

जुन्नर | वडगाव कांदळी | प्रतिनिधी – ग्रामीण प्रतिनिधी – नंदराम नेटके | चाणक्य NEWS
चाणक्य NEWS
जुन्नर तालुक्यातील जुन्नर ते नारायणगाव मार्गावर काळे पेट्रोल पंपासमोर मद्यधुंद अवस्थेत चारचाकी वाहन चालवून दोन दुचाकींना धडक दिल्याची घटना १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजता घडली. या प्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, प्रकाश सिताराम आहेर (रा. खामगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) हा लाल रंगाची मारुती ८०० कार क्रमांक MH 12 BG 1315 चालवत होता. वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून मद्यसेवन केलेल्या अवस्थेत वाहन चालवत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
यावेळी कारने फिर्यादी ओंकार नंदकिशोर ताजणे (वय २१, रा. कोळेमळा, नारायणगाव, ता. जुन्नर) यांच्या दुचाकीसह त्यांच्या मित्राच्या दुचाकीला धडक दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या अपघातात फिर्यादी व त्यांच्या मित्राला दुखापत झाली असून दोन्ही दुचाकींचे नुकसान झाल्याचे पोलिस तक्रारीत सांगण्यात आले आहे.
या प्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ व १८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस नोंदीनुसार, पोलीस हवालदार भोटे यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार भोटे यांच्याकडे आहे. या प्रकरणाचा तपास जुन्नर पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे.



