सांगवीतील आगीच्या दुर्घटनेतील नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्या !
डॉ. धम्मरत्न गायकवाड यांची पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडे मागणी

सांगवी, पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – मुख्य संपादक – कृष्णा गवळी | चाणक्य NEWS
सांगवी : पिंपरी-चिंचवडमधील सांगवी येथील करण जयमाला सोसायटी परिसरातील गीता गॅरेजला लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत गॅरेजसह इमारतीतील अनेक घरांचे आणि संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले असून, बाधित कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे पिंपरी-चिंचवड शहर युवक अध्यक्ष डॉ. धम्मरत्न शक्तिगुप्त गायकवाड यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.
https://youtube.com/shorts/yON8uHawsqg?si=u1FDW4Mor2OyLoCm


पाच मजली इमारतीपर्यंत आगीची झळ
मिळालेल्या माहितीनुसार, गीता गॅरेजमध्ये लागलेली आग काही वेळातच भडकली आणि तिची झळ संपूर्ण पाच मजली इमारतीपर्यंत पोहोचली. या दुर्घटनेत गॅरेजचे मालक प्रदीप परदेशी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. तसेच इमारतीतील रहिवाशांच्या घरांमधील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले.

गॅरेजच्या वरील पहिल्या मजल्यावर राहणारे राजेंद्र चोपडे यांच्या घरातील फर्निचर, बेडरूममधील साहित्य आणि अन्य वस्तू जळून नुकसान झाले. त्यांच्या घरातील एसीचा स्फोट झाल्याचीही माहिती समोर आली आहे. दुसऱ्या मजल्यावरील काळे कुटुंबीय आणि तिसऱ्या मजल्यावरील राजेंद्र भिलारे यांच्या घरांचेही नुकसान झाले. या घटनेत एका लहान चिमुरडीच्या हाताला आगीची झळ बसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे जीवितहानी टळली
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी सारंग सर, जवान जयपाल पाटील आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या तत्पर कार्यवाहीमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी जवान जयपाल पाटील यांनी धाडसाने घरात प्रवेश करून परिस्थितीची पाहणी केली आणि नुकसानग्रस्त कुटुंबीयांना धीर दिला. डॉ. धम्मरत्न गायकवाड यांनीही त्यांच्यासोबत घरात जाऊन झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली व बाधित कुटुंबीयांचे सांत्वन केले. अग्निशमन दलाच्या अधिकारी व जवानांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल आणि माणुसकीपूर्ण कार्याबद्दल डॉ. गायकवाड यांनी त्यांचे आभार मानले.
नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून भरपाई द्या
या आगीमुळे गॅरेज मालक आणि इमारतीतील रहिवाशांवर आर्थिक संकट ओढवले आहे. कष्टाने उभा केलेला संसार आणि उपजीविकेचे साधन आगीमुळे बाधित झाल्याने संबंधित कुटुंबांना पुन्हा उभे राहण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे.
या पार्श्वभूमीवर डॉ. धम्मरत्न शक्तिगुप्त गायकवाड यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त, प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींना पुढील मागण्या केल्या आहेत :
दुर्घटनास्थळाची तातडीने पाहणी करून नुकसानीचे अधिकृत पंचनामे करावेत.
गॅरेज मालक आणि बाधित घरमालकांच्या नुकसानीचे योग्य मूल्यांकन करावे.
शासन व महानगरपालिकेच्या लागू नियमांनुसार पात्र नुकसानग्रस्तांना आर्थिक सहाय्य आणि नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी कार्यवाही करावी.
आगीची झळ बसलेल्या चिमुरडीसह बाधित कुटुंबांना आवश्यक वैद्यकीय व इतर मदत उपलब्ध करून द्यावी.
“संकटाच्या काळात प्रशासनाने संवेदनशीलतेने पुढाकार घ्यावा”
“या कुटुंबांचे नुकसान केवळ आर्थिक नसून, त्यांनी कष्टाने उभ्या केलेल्या संसारालाही मोठा धक्का बसला आहे. अशा संकटाच्या वेळी प्रशासनाने संवेदनशीलतेने पुढाकार घेऊन बाधित कुटुंबांना पुन्हा उभे राहण्यासाठी मदत करावी. माणुसकीच्या नात्याने आपण सर्वांनीही त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे,” असे आवाहन डॉ. गायकवाड यांनी केले.
— चाणक्य NEWS
लोकशाहीचा निर्भय आवाज !



