भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांचा सर्व पदांचा राजीनामा; अत्याचाराच्या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात खळबळ

कल्याण/भिवंडी | चाणक्य NEWS | प्रतिनिधी :
कल्याण पश्चिमचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यावर एका २२ वर्षीय विवाहित महिलेने केलेल्या गंभीर लैंगिक अत्याचाराच्या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पवार यांच्यासह बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांच्याविरोधात भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचा पतीसोबत वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्याच्या उद्देशाने तिला कार्यालयात बोलावण्यात आले. त्यानंतर १३ सप्टेंबर रोजी तिला भिवंडी तालुक्यातील बापगाव येथील एका खासगी फार्महाऊसवर नेण्यात आल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. तेथे शस्त्राचा धाक दाखवून आणि मद्य पाजून अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
या घटनेनंतर पीडित महिलेने काँग्रेसच्या नगरसेविका कांचन कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला. महिलेने आपल्याकडे संबंधित व्हिडिओ आणि मोबाईल चॅट असल्याचे सांगितल्यानंतर तिला पडघा पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
गुन्हा दाखल होताच पवारांचा राजीनामा
या प्रकरणानंतर नरेंद्र पवार यांनी भाजपमधील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला असून, पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र पाठवून राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली आहे. उपलब्ध वृत्तांनुसार, पवार यांनी स्वतःवरील आरोप खोटे असून आपली बदनामी करण्याचे षडयंत्र असल्याचा दावा आपल्या पत्रात केला आहे.
दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपांची सत्यता तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुन्हा दाखल होणे हे आरोप सिद्ध झाल्याचे द्योतक नसून, अंतिम सत्य तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट होईल.
चाणक्य NEWS — लोकशाहीचा निर्भय आवाज !




