महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती; ‘ट्रिगर-१’ लागू

मुंबई | प्रतिनिधी – मुख्य संपादक – कृष्णा गवळी | चाणक्य NEWS
महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने खरीप हंगाम २०२६ मध्ये राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीचा ‘ट्रिगर-१’ लागू झाल्याची माहिती दिली आहे. शासन निर्णय दिनांक २५ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे.
शासन निर्णयानुसार, जूनपासून आतापर्यंत झालेल्या पर्जन्यमानातील तूट आणि इतर घटकांमुळे प्रभावित झालेल्या तालुक्यांचा कृषी आयुक्तांच्या अहवालाच्या आधारे आढावा घेण्यात आला. या तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-१’ लागू असल्याने पंचनामे करण्याची कार्यवाही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पुणे विभागातील परिस्थिती
शासनाच्या परिशिष्टानुसार पुणे विभागातील पुणे जिल्ह्यात ८, सोलापूरमध्ये ११, सांगलीमध्ये ४ आणि सातारा जिल्ह्यात ६ तालुक्यांमध्ये ट्रिगर-१ लागू करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यात भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या तालुक्यांचा समावेश आहे.
मराठवाड्यात मोठा परिणाम
छत्रपती संभाजीनगर विभागातील अनेक जिल्ह्यांमध्येही दुष्काळी परिस्थितीची नोंद करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९, जालना ८, बीड ११, लातूर १०, धाराशिव ८, नांदेड १४, परभणी ९ आणि हिंगोली ५ तालुक्यांचा समावेश आहे.
बुलढाणा जिल्ह्यात १३, अमरावती जिल्ह्यात १४ आणि अकोला जिल्ह्यात ७ तालुक्यांना ‘ट्रिगर-१’ लागू करण्यात आला आहे.
पंचनामे व पीक परिस्थितीचा अहवाल
सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची सद्यस्थिती दर्शविणारे छायाचित्र आणि GPS कोऑर्डिनेट संकलित करून पीक परिस्थितीचा अहवाल कृषी आयुक्तांच्या माध्यमातून शासनाला तात्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महत्त्वाचे: ‘ट्रिगर-१’ लागू होणे म्हणजे संबंधित भागातील दुष्काळी परिस्थितीच्या पुढील प्रशासकीय कार्यवाहीची सुरुवात आहे. या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे पंचनामे व पीक परिस्थितीचा अहवाल तयार करण्याची प्रक्रिया पुढे राबवली जाणार आहे.
चाणक्य NEWS | ( लोकशाहीचा निर्भय आवाज! )




