‘बिग बॉस मराठी’ फेम दिव्या शिंदेविरोधात गुन्हा; डॉक्टरांकडे ५ लाखांची मागणी केल्याचा आरोप

पुणे | प्रतिनिधी – मुख्य संपादक – कृष्णा गवळी | चाणक्य NEWS
पुण्यातील एका सांस्कृतिक महोत्सवाच्या प्रसिद्धीवरून वाद निर्माण झाला असून, ‘बिग बॉस मराठी’ फेम सोशल मीडिया स्टार दिव्या शिंदे आणि तिचा साथीदार आण्णा ढमढेरे यांच्यासह आठ ते दहा जणांविरोधात ज्येष्ठ डॉक्टरांना मारहाण करून पाच लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. विद्याधर गायकवाड यांच्या तक्रारीवरून काळेपडळ पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
डॉ. विद्याधर गायकवाड हे पुणे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलचे माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी असून २०२१ मध्ये ते निवृत्त झाले आहेत. ते करुणादीप फाउंडेशनशी संबंधित असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संस्थेच्या वतीने १ ते ३ सप्टेंबरदरम्यान बालगंधर्व रंगमंदिरात ‘कला आविष्कार महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता.
तक्रारीनुसार, या महोत्सवाच्या प्रसिद्धीसाठी दिव्या शिंदे यांना कोणतीही अधिकृत जबाबदारी देण्यात आली नव्हती. मात्र, प्रसिद्धी केल्याचा दावा करत ऑगस्ट महिन्यापासून डॉ. गायकवाड यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.
घरात घुसून मारहाणीचा आरोप
१७ सप्टेंबर रोजी दिव्या शिंदे, आण्णा ढमढेरे आणि काही साथीदार डॉ. गायकवाड यांच्या घरी गेले होते, असे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी त्यांना एका हॉटेलमध्ये बोलावून पुन्हा पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

त्यानंतर २४ सप्टेंबरच्या रात्री डॉ. गायकवाड यांच्या घरी काही जण घुसले आणि त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच डोक्यावर धारदार हत्याराने वार केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. घरातील साहित्याची तोडफोड करून त्यांची कार घेऊन गेल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या घटनेत जखमी झालेल्या डॉ. गायकवाड यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे वृत्त आहे.
पोलिस तपास सुरू
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक अमित शेटे पुढील तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे.
— चाणक्य NEWS ( लोकशाहीचा निर्भय आवाज ! )




