Welcome to Chanakya News 24   Click to listen highlighted text! Welcome to Chanakya News 24
महाराष्ट्रलातूर

शिरूर अनंतपाळ येथे बोगस खरेदीखताद्वारे जमीन हडपण्याचा प्रयत्न

तलाठ्यासह तिघांवर गुन्हा दाखल; वडिलोपार्जित ७/१२ उताऱ्यात बेकायदेशीर फेरफार केल्याचा आरोप

शिरूर अनंतपाळ | चाणक्य NEWS प्रतिनिधी

शिरूर अनंतपाळ येथे वडिलोपार्जित शेतजमीन बोगस व बनावट खरेदीखताच्या आधारे हडप करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महसूल रेकॉर्डमध्ये बेकायदेशीर फेरफार केल्याच्या आरोपावरून तलाठ्यासह तिघांविरुद्ध शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन आरोपी शासकीय कर्मचारी असल्याची माहिती आहे.

या प्रकरणी राहुल संजिव व्यंजने (वय ३३, रा. शिरूर अनंतपाळ) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी आणि अन्य एका व्यक्तीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

२००१ मधील वाटणीनंतर जमीन वडिलांच्या व मुलाच्या नावे

फिर्यादीनुसार, मौजे शिरूर अनंतपाळ येथील गट क्र. १४/१४/ब मध्ये त्यांची वडिलोपार्जित शेतजमीन आहे. सन २००१ मध्ये झालेल्या तोंडी वाटणीनुसार महसूल रेकॉर्डमध्ये फेरफार क्रमांक ३०३७ अन्वये ०१ हेक्टर ११ आर क्षेत्राची नोंद फिर्यादीच्या वडिलांच्या व त्यांच्या मुलाच्या नावे करण्यात आली होती.

या नोंदीला तसेच वाटणीपत्राला आजपर्यंत कोणाचीही हरकत नसल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.

जुन्या खरेदीखताच्या आधारे फेरफार केल्याचा आरोप

असे असताना आरोपींनी संगनमत करून सन २००१ मधील एका जुन्या खरेदीखताचा आधार घेतल्याचा आरोप आहे. सदर खरेदीखताची मुदत संपुष्टात आली असून ते सक्षम न्यायालयाने बेकायदेशीर ठरवले असल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे.

तरीही सन २०२५ पर्यंत हे खरेदीखत महसूल दप्तरी सादर करण्यात आले नाही. त्यानंतर अचानक फेरफार क्र. ७१५२ मंजुरीसाठी घेण्यात आल्याचा आरोप आहे.

शासकीय पदाचा तसेच इलेक्ट्रॉनिक संगणकीय प्रणालीचा गैरवापर करून महसूल रेकॉर्डमध्ये बदल करण्यात आला आणि फिर्यादीच्या नावावरील क्षेत्र कमी करून अन्य व्यक्तीच्या नावाची नोंद घेण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

चौकशीत तलाठ्याच्या कामकाजावर ठपका

या कथित बेकायदेशीर फेरफाराबाबत फिर्यादीने जिल्हाधिकारी, जमाबंदी आयुक्त तसेच महसूल मंत्र्यांकडे तक्रार केली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसीलदार, शिरूर अनंतपाळ यांनी या प्रकरणाची चौकशी केली.

चौकशीदरम्यान संबंधित तलाठ्याने कर्तव्यात कसूर करून महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचे उल्लंघन केल्याचे तसेच खोटे रेकॉर्ड तयार करून प्रकरणाला समर्थन दिल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

चौकशी अहवालात दोष आढळल्यानंतर अखेर पोलिसांत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांचा पुढील तपास सुरू

शिरूर अनंतपाळ पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील कलम २०१, २५५, २५६, २५७, २५८, २५९, ३१६(१), ३१८, ३३६(१), ३३७ आणि ३३८ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

पोलीस निरीक्षक अनंत भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. महसूल रेकॉर्डमध्ये फेरफार कसा झाला, संबंधित खरेदीखताची सत्यता काय आहे आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!