विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील प्रलंबित कामांना गती देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
रुग्णालयातील सेवा, सुरक्षा व पायाभूत सुविधांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा; विविध कामांची पाहणी

लातूर | प्रतिनिधी | चाणक्य NEWS | प्रतिनिधी
लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विविध विकासकामांना गती देण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी रुग्णालयातील सेवा, सुरक्षा, अग्निसुरक्षा तसेच पायाभूत सुविधांशी संबंधित विविध मुद्द्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
महाविद्यालयाच्या परिषद दालनात झालेल्या बैठकीस लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी, अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात, कार्यकारी अभियंता श्री. टेकाळे, भूमि अभिलेख विभागाच्या जिल्हा अधीक्षक नसीम पटेल, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कार्यकारी अभियंता अशोक जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. नरवडे, अग्निशमन अधिकारी गणेश चौधरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देणार
बैठकीत दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. यासंदर्भातील प्रस्ताव शासन स्तरावर सादर करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली. प्रशिक्षण केंद्राची जागा लवकरात लवकर दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी वर्ग करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी स्पष्ट केले.
फायर स्टेशनसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना
महाविद्यालय परिसरात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून फायर स्टेशन उभारण्याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. रुग्णालयाच्या अग्निसुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन विभागामार्फत नियमितपणे मॉक ड्रिल आयोजित करण्यात याव्यात, अशाही सूचना त्यांनी दिल्या.
माता-बाल रुग्णालय व क्रिटिकल केअर हॉस्पिटलच्या कामांना वेग
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेली महाविद्यालय व रुग्णालयाशी संबंधित सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच रुग्णालय परिसरात उभारण्यात येणाऱ्या माता-बाल रुग्णालय आणि क्रिटिकल केअर हॉस्पिटलच्या कामांना गती देऊन ती लवकर पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
या कामांसाठी आवश्यक निधीचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचनाही राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आल्या.
कचरा व मोकाट प्राण्यांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश
रुग्णालय परिसरातील कचरा नियमितपणे उचलण्यात यावा तसेच परिसरात फिरणाऱ्या मोकाट डुकरांचा आणि कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी रुग्णालयाला २४ तास पाणीपुरवठा करण्यासह वसतिगृह, महाविद्यालय आणि इतर विभागांसाठी स्वतंत्र मीटर बसवून आवश्यकतेनुसार पुरेसा पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती दिली.
अग्निशमन यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी
बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील सुरू असलेल्या विविध कामांची तसेच अग्निशमन यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रलंबित कामे आणि सुरक्षाविषयक उपाययोजनांमध्ये कोणतीही दिरंगाई होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.



